Bihar Election 2025 – पक्षाला नोटापेक्षा कमी मतं, निवडणुकीत झाला सुपडासाफ; निकाल लागताच उमेदवारानं रुग्णालयात सोडले प्राण

बिहारच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहार विधानसभेच्या  निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. मात्र या निवडणुकीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यांच्या पक्षाला नोटापेक्षाही कमी मत मिळाल्याने जनसुराज्य पक्षात नाराजी असताना आणखी एक दु:खद घटना घडली. पक्षाच्या पराभवानंतर जनसुराजचे उमेदवार चंद्रशेखर सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

तरारी विधानसभेतून चंद्रशेखर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. तरीरी विधानसभेतून त्यांना 2271 मतं मिळाली. उमेदवारी मिळाल्यापासूनच ते निवडणुकीच्या प्रचारात गुंतले होते. दरम्यान 31 ऑक्टोबर रोजी प्रचार सभेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान निकालाच्या दुसऱ्याच दिवशी 14 ऑक्टोबर रोजी त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चंद्रशेखर सिंह यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कोण होते चंद्रशेखर सिंह

चंद्रशेखर सिंह हे निवृत्त मुख्याध्यापक होते. ते मूळचे कुरमुरी गावचे होते. त्यांना राजकारणातील कोणताही अनुभव नव्हता. प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केल्यानंतर चंद्रशेखर त्यांच्या कामामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी पक्षातून निवडणूक लढण्याचीही संधी मिळाली.

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! एनडीएला पुन्हा पाशवी बहुमत!! जनमत आणि मतमोजणीत तफावत! गडबडीचा संशय!!