
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वयोमानाने थकले असून त्यांची प्रकृती बरी नसल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी यावर भाष्य केले आहे. वेळ पडल्यास नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे.
यूएसए टूडेला दिलेल्या मुलाखातीत ते बोलत होते. ट्रम्प यांच्या प्रकृती बरी नसल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. ट्रम्प हे ठणठणीत असून त्यांचा उत्साह अवर्णनीय आहे. प्रचंड ऊर्जेने ते काम करत आहेत. ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील व अमेरिकेच्या जनतेसाठी उत्तुंग काम करतील, याची मला खात्री आहे, असे व्हान्स म्हणाले.
अध्यक्षपदाची शपथ घेणारे ट्रम्प हे सर्वात वयोवृद्ध
ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱयांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय 78 वर्षे 7 महिने होते. अध्यक्षपदाची शपथ घेणारे ते सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष आहेत. त्यांच्या आधीचे अध्यक्ष जो बायडन यांनी शपथ घेतली, तेव्हा त्यांचे वय 78 वर्षे 2 महिने होते.