
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या झोनल डायरेक्टरपदी अखेर अमित घावटे याची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून एनसीबीच्या झोनल डायरेक्टरची अतिरिक्त जबाबदारी ही ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे होती.
कॉड्रीला क्रूझप्रकरणी एनसीबीने कारवाई करून आर्यन खानसह काहींना अटक केली होती. आर्यनच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह दोन अधिकाऱयांवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपाची दखल घेत एनसीबीच्या दक्षता पथकाने झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचीदेखील चौकशी केली होती. चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. या घटनेनंतर समीर वानखेडे यांना पुन्हा डीआरआयला पाठवण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या झोनल डायरेक्टरपदाचा अतिरिक्त कार्यभार हा ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे होता. नुकतेच आर्यन खान प्रकरणात एनसीबीने आरोप पत्र सादर करण्यात न्यायालयाकडे वेळदेखील मागितला होता. त्याचीदेखील दखल घेत एनसीबी मुख्यालयाने एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टरच्या पूर्ण वेळ पदाचा कारभार अमित घावटे यांच्याकडे सोपवला आहे. अमित घावटे हे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. घावटे हे बंगळुरू आणि चेन्नईचे झोनल डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्याच्याकडे बंगळुरू विभागाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.


























































