
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही मूळचे गुजरातचे असून तेथे त्यांचे घर आहे, त्यामुळे ते दोघेही घुसखोरच आहेत, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी केली आहे. नागरिकत्व विधेयकातील दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर आज चौधरी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
नागरिकत्व विधेयकातील दुरुस्तीसाठी गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीत उत्तर पूर्वेकडील राज्यातील नेते आणि नागरी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. नागरिकत्व विधेयकातील दुरुस्तीच्या माध्यमातून सरकार केवळ हिंदूंनाच देशात ठेवू इच्छित असून मुस्लिमांना पळवून लावण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी सरकार विधेयक सहज मंजूर करू शकेल, पण त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना जाणीव नाही असे अधीररंजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जगभरातील स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक संख्या हिंदुस्थानींची आहे. ते वर्षाला हजारो कोटी रुपये हिंदुस्थानात पाठवत असल्याने अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळत आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून काही तरी शिकावे असेही त्यांनी सुनावले. तसेच नागरिकत्व विधेयकामुळेच भाजपचा पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत नुकताच पुरता सफाया झाला आहे. त्यामुळे हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली तर लवकरच देशभरात सफाया होईल, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.

























































