सत्तर हजार कोटी सिंचनावर खर्च झाले मग पाणी कोठे गेले? – अमित शाह

945

सातारा जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाच वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यातील 38 हजार हेक्टर जमिनीवरील पाण्याचा प्रश्न भाजप सोडविणार आहे. 70 हजार कोटी रुपये अजित पवारांनी सिंचनावर खर्च केले. पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी सांगावे, सिंचनावर खर्च केला मग पाणी कोठे गेले, असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. कराड येथील शिवाजी स्टेडियमवर महाजनादेश संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अतुल भोसले म्हणतात मी छोटा कार्यकर्त्या आहे.परंतू भाजप कार्यकर्त्याचा पक्ष आहे. छोटे छोटे कार्यकर्त्येच पक्षाला पुढे घेऊन जात आहेत. राष्ट्रवादाचे विचार ते पुढे नेत आहे. मोदींपासून सर्वच कार्यकर्ते पोस्टर चिटकवून मोठे झाले आहेत. अतुलचा गेल्यावेळी विधानसभेला पराभव झाला असला तरी तुम्ही पुन्हा एकदा अतुलला मतदान करुन आमदार करा, मी मंत्री करतो असे आश्वासन अमित शहा यांनी दिले. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, कराड दक्षिण मतदार संघाचे उमेदवार अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सहकार परिषदचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सांगलीच्या निती केळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, मदनराव मोहिते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विनायक पावस्कर, विद्या पावस्कर, अंजली कुंभार, कविता कचरे, मोहन जाधव, भाजपा शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुनिल पाटील उपस्थित होते.

उदयनराजे भोसले व अतुल भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. आपण ज्यांच्याकडून प्रेरणा घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. या भूमीने भगव्या ध्वजाचा सन्मान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहचविला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली.सर्वाधिक पाऊस चेरापुंजीपेक्षा सातारा जिल्ह्यामध्ये झाला.सध्या निवडणूका सुरु असून निवडणूकीनंतर केंद्र सरकार पुरग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावेल असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

कृष्णा खोर्‍याची कामे गेल्या 15 वर्षामध्ये झाली नाहीत.शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा कृष्णा खोर्‍यांची कामे सुरु झाली.26 मोठ्या योजना असून त्याची कामे मार्गी लावली जातील.कृष्णा खोर्‍याच्या कामामध्ये काँग्रेसने भष्ट्राचार केला आणि सिंचनाची कामे अपुरी ठेवली.शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? असा प्रश्न उपस्थित करुन अमित शहा म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आले की त्यांना विचारा तुम्ही प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री होता तेव्हा महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार विचारतात 370 चा महाराष्ट्राचा काय संबंध ? कराड-सातारामधील जनतेचे काश्मीरवर प्रेम आहे किंवा नाही असा सवाल त्यांनी जनतेला केला. यावेळी उदयनराजे भोसले, डॉ. अतुल भोसले यांची भाषणे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या