माझं ठरलंय, शेती आणि… अमित शहा यांनी सांगितला राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान

आपल्या देशात राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरलेले नाही. अनेक जण लवकर निवृत्ती घेतात, तर काही शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणामध्ये सक्रिय राहतात. पण, भाजपमध्ये वयाच्या 75व्या वर्षी राजकीय निवृत्ती घेण्याची अलिखित परंपरा आहे. पंतप्रधान मोदींना सप्टेंबर महिन्यात 75 वर्ष पूर्ण होत असून ते काय निर्णय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या राजकीय निवृत्तीबाबत विधान केले आहे. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी राजकीय निवृत्तीनंतरची योजना सांगितली.

गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकारी संस्थांमधील महिलांसोबत सहकार संवाद कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान सांगितला. मी निवृत्त झाल्यानंतर माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गित शेतीसाठी देण्याचे ठरवले आहे, असे अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीचेही महत्त्व अधोरेखित केले.

नैसर्गिक शेती हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे. नैसर्गित शेतीमुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. रासायनिक खतांसह पिकवलेला गहू खाल्ल्यामुळए कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडसह अनेक आजार बळावतात. त्यामुळे रसायनमुक्त अन्न खाल्ल्यास औषधांचीही गरज भासत नाही, असे अमित शहा यांनी म्हटले.

नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनही वाढते. मी माझ्या शेतात नैसर्गिक शेतीचा अवलंब केला असून यामुळे धान्य उत्पादनात दीड पट वाढ झाल्याचेही शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाला होणारा फायदाही सांगितला.

मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा शेतातून पाणी वाहून जाते. परंतु सैंद्रिय शेतीत एक थेंबही बाहेर जात नाही आणि तो जमिनीतच झिरपतो. नैसर्गिक शेतीमुळे पाणी मुरण्याचे अनेक मार्ग तयार होतात, असेही ते म्हणाले. तसेच सैंद्रिय शेतीसाठी एक गायही पुरसेही असून तिच्यापासून निर्माण होणाऱ्या शेणखतापासून 21 एकर शेती करू शकतो, असा दावाही शहा यांनी केला.