झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन नागपूरमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर 

अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाचे चित्रीकरण नागपुरात सुरू झाले आहे. अमिताभ बच्चन सोमवारी नागपुरात दाखल झाले. शहरातील गड्डीगोदाम परिसरातील मोहननगर येथील सेंट जॉन हायस्कूलच्या मैदानावर चित्रपटाचा सेट उभारण्यात आला असून ‘बीग-बी’ थेट शूटिंगस्थळी रवाना झाले. येतानाच बीग-बी स्पोर्टस् ड्रेसमध्ये आले. शूटिंगबाबत अधिक जाणून घेण्यासाठी विजय बारसे यांच्याशी संपर्क साधला असता आपणास त्या बाबत अधिकची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. शूटिंगस्थळी आपणास बोलावले नाही. उद्यापासून आपण दोन-चार दिवस बाहेरगावी चालल्याचे बारसे यांनी सांगितले.

झोपडपट्टीतील मुलांना खेळाच्या माध्यमातून करिअरचे नवे दालन उघडून देणाऱ्या प्रो. विजय स्टिफन बारसेंच्या कार्यावर ‘झुंड’ आधारित आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या मुलांच्या जीवनाला फुटबॉलच्या माध्यमातून आकार देण्याचे काम नागपुरातील विजय स्टिफन बारसे या अवलियाने करून दाखवले आहे. सुमारे १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ साली अशीच काही झोपडपट्टीतील मुले ऊन-पावसाची तमा न बाळगता अनवाणी फुटबॉल खेळताना प्रा. विजय बारसे यांना दिसली. कुठलीही साधने नसताना तहानभूक विसरून फुटबॉल खेळणारी मुले पाहून या मुलांमधून अव्वल फुटबॉलपटू घडविण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली. तिथूनच झोपडपट्टीतील टॅलेन्ट शोधणाऱ्या ‘स्लम सॉकर’चा जन्म झाला.

नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील आठ मुलांना घेऊन त्यांनी झोपडपट्टीत फुटबॉल सुरू केला. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. समाजाने नाकारलेल्या आणि त्यामुळेच वाममार्गाला जाण्याची शक्यता असलेल्या झोपडपट्टीतील मुलामुलींमध्ये विजय बारसे यांनी फुटबॉल खेळाचे प्रेम रूजवले. त्यातूनच स्लम सॉकर नावाचा उपक्रम जन्माला घातला. बारसेंनी घडवलेल्या या फुटबॉलपटूंनी परदेशात होणाऱ्या होमलेस फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतही जबरदस्त चमक दाखविली.

बारसे यांचा संघर्ष व झोपडपट्टी फुटबॉलचा रंजक तेवढाच चित्तथरारक प्रवास ‘झुंड’ मध्ये दाखविण्यात आला आहे.  झोपडपट्टीतील या उपेक्षित मुलांच्या जीवनात विजय स्टिफन बारसे यांनी जगण्याची नवी उमेद जागवली…ती जाणीवपूर्वक रूजवली…झोपडपट्टी फुटबॉलच्या रोपट्याचा आता वड झालाय…या वडाच्या पारंब्यांचाही वड होऊन एक अख्खे वडाचे बनच तयार झालेय. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित ‘झुंड’ हा चित्रपट आहे.