आईच्या पदराची सर कशालाच नाही! बिग बी झाले भावूक

527

आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक घडामोडी बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावरून शेअर करत असतात. डोळ्याला झालेल्या त्रासानंतर आईच्या आठवणीत भावूक झालेल्या बिग बी यांनी सोशल मीडियावरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आईच्या पदराची सर दुसर्‍या कशालाच नाही, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

बिग बी म्हणाले, ‘डावा डोळा फडफडत होता. हे अशुभ असते असे मी लहानपणी ऐकले आहे. डॉक्टरांना दाखवायला गेलो तर त्यांना डोळ्यात एक काळा ठिपका दिसला. डॉक्टर म्हणाले, काही नाही… हे वयामुळे झाले आहे. लहानपणी आई पदराचा बोळा करून फुंकर मारून डोळ्याला शेक द्यायची, तसे करा, सर्वकाही ठीक होईल. पण आता आई नाहीये… विजेद्वारे रूमाल गरम करून डोळ्याला शेक घेतोय, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आईचा पदर तर आईचा पदरच असतो… त्याला दुसर्‍या कशाची सर नाही.’ अशी पोस्ट बिग बी यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकर्‍यांनीदेखील भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या