बॉलीवूडच्या ‘सत्ता’धीशाची कमाल, 77 व्या वर्षी एका दिवसात तब्बल 7 चित्रपटांचे शूटिंग

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांपुढे मेहनतीचे आदर्श उदाहरण उभे केले आहे. 77 वर्षीय अमिताभ यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडत एक-दोन नव्हे, तर तब्बल सात चित्रपटांचे शूटिंग केले. यात 4 फुल लेन्थ आणि 3 शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे. कामासाठी सर्वात चांगला दिवस तो असतो, ज्यावेळी इतर लोक आराम करीत असतात, असे मत त्यांनी सोमवारी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केले.

कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतलेल्या अमिताभ बच्चन यांनी नव्या दमाने शूटिंगची सुरुवात केली आहे. अशातच रविवारच्या एका दिवसातील त्यांच्या अविश्रांत मेहनतीने सर्वांनाच थक्क केले आहे. त्यांनी सोमवारी ब्लॉगवर चित्रीकरणासंबंधी काही स्टील्स शेअर केल्या.

त्यांनी ‘रविवार.. 4 फुल लेन्थ चित्रपट, 3 शॉर्ट फिल्म, 6 क्रोमा शूट, स्टिलचे दोन सेट… होय’, असे एका दिवसातील शुटींग शेडय़ुल सादर केले. तसेच शूटिंगचा फोटो शेअर करतानाच ‘मी आधीच थकलोय’ असेही त्यांनी म्हटले. ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या  शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या