अमिताभ बच्चन यांच्याकडून अयोध्येत भूखंड खरेदी, मंदिर परिसरातील जागेसाठी मोजले साडेचौदा कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत सुमारे साडेचौदा कोटींचा भूखंड खरेदी केला असून, मंदिरापासून काही अंतरावर हा दहा हजार चौरस फुटांचा भूखंड आहे.

मुंबईस्थित रियल्टी फर्म हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याकडून विकसित होणाऱया द शरयू प्रकल्पातील हा भूखंड आहे. अयोध्येला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यासाठी मी उत्सुक आहे, असे बच्चन यांनी यासंदर्भात म्हटले आहे.

द शरयू प्रकल्प राम मंदिर लोकार्पण दिनी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजीच सुरू करण्याची लोढा समूहाची योजना आहे. 45 एकरांवर पसरलेल्या या लक्झरी प्रकल्पात आलिशान व्हिला, बंगले यांच्याबरोबरच शरयू नदीकाठावर एक पंचतारांकित हॉटेलही उभे राहणार आहे. यासाठी कंपनीने लीला पॅलेसेस, हॉटेल्स आणि रिसॉर्टस्सोबत सामंजस्य करार केला आहे.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अभिनंदन लोढा यांच्या कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. या नियोजित गुंतवणुकीपैकी एक हजार कोटी रुपये अयोध्येत गुंतवले जाणार आहेत.

12.20 ते 1 या दरम्यान होणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
22 जानेवारीला दुपारी 12.20 ते 1 या दरम्यान प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली. 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठsचा कार्यक्रम सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची भाषणे होणार आहेत, असेही चंपत राय यांनी सांगितले.