बारा मिनिटांचा संवाद एकाच टेकमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल बारा मिनिटांचा दीर्घ संवाद एकाच टेकमध्ये पूर्ण करत महानायक अमिताभ बच्चन यांनी विक्रम रचला आहे. ’चेहरे’ या चित्रपटातील त्यांच्या या मोनोलॉगची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा मोनोलॉग महिलांवरील हिंसाचारावर तयार करण्यात आला असून बिग बी यांनीच त्याचे लेखन केले आहे. यापूर्वी ’प्यार का पंचनामा’ या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने सात मिनिटांचा दीर्घ संवाद बोलत सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

या मोनोलॉगबाबत माहिती देताना निर्माते आनंद पंडित म्हणाले, यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याने एखाद्या विषयावर इतका मोठा संवाद सादर केलेला नाही. बच्चन साहेबांनीच हा संवाद लिहिला असून त्यांनीच तो एका टेकमध्ये सादर केला आहे. आता आम्ही बारा मिनिटांच्या या मोनोलॉगचा महिलांच्या सुरक्षिततेवर क्हिडीओ तयार करण्याच्या विचारात आहोत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध संस्थांना हा व्हिडीओ मोफत दिला जाईल.

रूमी जाफरी दिग्दर्शित ’चेहरे’ हा चित्रपट 27 ऑगस्टला प्रदर्शित झाला असून त्यात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘चेहरे’च्या निमित्ताने बिग बी यांनी रचला विक्रम

महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘चेहरे’ या चित्रपटात मानधनाशिवाय काम केले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत निर्माते आनंद पंडित म्हणाले, बिग बी यांना चित्रपटाची स्क्रीप्ट आवडल्यामुळे त्यांनी मानधनाशिवाय काम करण्याचा निर्णय घेतला. अगदी सेटकर येण्या-जाण्याचा खर्चदेखील स्वतः केला. परदेशात शूटिंगला जाण्यासाठी लागणाऱया चार्टर प्लेनचा खर्च त्यांनीच केला. त्यामुळे त्यांच्या नावापुढे फ्रेंडली ऑपियरन्स लिहिण्यात आले आहे.