
बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन हे सध्या रियालिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. या शो दरम्यान ते चित्रिकरणाचे, खऱ्या आयुष्यातील अनेक भन्नाट किस्से सांगतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये त्यांनी तुफान हिट झालेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यानचा एक किस्सा सांगितला. चित्रिकरणा दरम्यान अभिनेता धर्मेंद्र याने रागाच्या भरात गोळी चालवली आणि टेकडीवर उभा असलेला अमिताभ थोडक्यात बचावला.
‘कौन बनेगा करोडपती’चा नवा एपिसोड नुकताच प्रसिद्ध झाला. यात अमिताभ बच्चन हैद्राबादच्या प्रितमोहन सिंग यांच्याशी प्रश्नोत्तराचा खेळ खेळाताना दिसले. प्रितमोहन सिंग हे डीआयजी पदावर कार्यरत आहेत. शोमध्ये प्रितमोहन यांची पत्नी सतविंदर कौर यांनी आपले पती अमिताभ बच्चन आणि त्यांच्या ‘शोले’ या चित्रपटाचे जबरा फॅन असल्याचे सांगितले. हा चित्रपट टीव्हीवर लागला की आम्ही प्रत्येकवेळी पाहतो असेही त्या म्हणाल्या.
शो दरम्यान अमिताभ यांनी 1975 ला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान घडलेला किस्सा सांगितला. एकाच दृश्यासाठी अनेकदा रिटेक द्यावा लागल्याने धर्मेंद्र चांगलाच भडकला होता. दृश्यामध्ये धर्मेंद्रला एका खोक्यातून गोळ्या काढून खिशात भरायच्या होत्या. दोन-तीन वेळा चित्रित करूनही हे दृश्य हवे तसे होत नव्हते. त्यामुळे भडकलेल्या धर्मेंद्र याने हातातील बंदुकीतून गोळी झाडली आणि ही गोळी अमिताभ यांच्या कानाजवळून गेली.
या दृश्याच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन एका टेकडीवर उभे होते. याच दरम्यान धर्मेंद्र याने आजूबाजूला न बघता गोळी झाडली आणि ती बिग बी यांच्या कानाजवळून गेली. त्यावेळी ते थोडक्यात वाचले होते.






























































