‘सूर्यवंशम’ चित्रपट अजून कितीवेळा दाखवणार आहात? व्यथित प्रेक्षकाचे टीव्ही चॅनलला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ चित्रपट वर्षानुवर्षे टीव्ही चॅनलवर जवळपास दररोज दाखवला जातो. ‘सूर्यवंशम’ चित्रपट अनेकवेळा पाहिल्यानंतर आता लोकं या चित्रपटाला कंटाळले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एका व्यक्तीने याबद्दल थेट टीव्ही चॅनलला पत्र लिहिले आहे. ‘सूर्यवंशम’च्या टेलिकास्टबाबत त्या व्यक्तीने टीव्ही चॅनलला पत्र लिहून म्हटले आहे की, ‘सूर्यवंशम’ची संपूर्ण कथा आम्हाला कळली आहे, हीरा ठाकूरबद्दलही सर्व माहिती मिळाली आहे. आता नेमकं कधीपर्यंत या चित्रपटाचे प्रसारण सुरु राहणार आहे?

प्रेक्षकेने टीव्ही चॅनलला लिहिलेले हे मजेशीर पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पत्रात त्या व्यक्तीने नाराजी व्यक्त करत लिहिले की, ‘तुमच्या चॅनलला सूर्यवंशम या चित्रपटाच्या प्रसारणाचे कंत्राट मिळाले आहे. तुमच्या कृपेने मी व माझ्या कुटुंबाने हीरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखले आहे. तुमच्या वाहिनीने हा चित्रपट किती वेळा प्रसारित केला आहे? भविष्यात हा चित्रपट आणखी किती वेळा प्रसारित होणार? त्याचा आपल्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण? कृपया हे कळवण्याची कृपा करावी…’