पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा फडणवीसांना इशारा; म्हणाले तुमच्या पाळीव…

भाजप आणि अजित पवार गट सत्तेत एकत्र आहे. अजित पवारांचा गट एनडीएचा सदस्यही आहे. असे असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करतात. गोपीचंद पडळकरांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे. या वक्तव्याबाबत अमोल मिटकरी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला आहे.

गोपीचंद पडळकरांच्या या टीकेनंतर अजित पवार गटाने पडळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो, तुमचा तो पाळलेला गोप्या हा त्याच्या लायकीपेक्षा जास्त भूंकतोय. आज तो त्याच्या लायकीबाहेर भूंकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपल्या जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही. सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही, देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी, वेसण घालावी, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

आमदार अमोल मिटकरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला आहे. ते म्हणाले, तुम्ही गोप्याला वेसण घातली नाही तर त्याचा उसळता वारू आम्ही आवरू, त्याला वेसण घालण्याची क्षमता अजित पवारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यात आहे. गोपीचंद पडळकरला अजित पवारांविरोधात निवडणुकीला उभा राहिल्यावर बारामतीकरांनी त्याची लायकी दाखवून दिली आहे. मात्र राजरोजसपणे अजित पवारांवर तोंडसूख घेणाऱ्या गोप्याला तुम्ही आवर घलणार की नाही? तुम्ही त्याला आवर घालणार नसाल तर आम्हाला आवरणं तुमच्यासाठी कठीण होईल. ही आमची सूचना आहे,अशा शब्दांत मिटकरी यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.