अमरावतीत लसीकरणासाठी 5 केंद्र, सुमारे 17 हजार लसींचा डोस मध्यरात्री प्राप्त

लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्यात पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय,अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या केंद्रांवर शुभारंभदिनी लसीकरण होईल.

कोरोनालस बुधवारी मध्यरात्री अमरावती येथे येऊन पोहोचली. सुमारे 17 हजार लसींचा डोस प्राप्त जिल्ह्याला प्राप्त झाला असून,तो शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून, त्यात सर्वप्रथम हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे.

प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या दिवशी 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.

लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून काल रात्री दोन वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचले.जिल्हा आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही सकाळी लसवाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या