
मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे जिल्हापरिषद शाळेच्या आवाराची भिंत कोसळून लगतच राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला.
या घरातील सात व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही. गावातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने मोठा अनुचित प्रकार टळला. सदर घटना 13 जून रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.
मंगेश लक्ष्मणराय कुरवाडे (31), गजानन लक्ष्मणराव कुरबाडे (34), आर्यन मंगेश कुरवाडे (6), सुर्यकांता मंगेश कुरबाडे (26), नर्मदा लक्ष्मणराव कुरबाडे (65), अंबिका गजानन कुरबाडे (30), साक्षी गजानन कुरवाडे (14), श्रेया गजानन कुरवाडे (12), सोनाली गजानन कुरवाडे (9) सर्व रा.उदखेड हे ढिगाऱ्याखाली खाली दबून किरकोळ जखमी झाले.
त्यापैकी मंगेश लक्ष्मण कुरवाडे हा दबला गेला होता; परंतु दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. लगेच गावातील मोहन अडाऊ, किशोर पाटील, मनोहर कुरबाडे यांनी जखमींना उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


























































