रोनाल्डो विरुद्ध कोका कोला लढतीत देशी ब्रॅण्डची जबरदस्त ‘किक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडेच युरो 2020 स्पर्धेच्या सामन्यापूर्वी पोर्तुगालचा कर्णधार आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चर्चेत आला तो एका वेगळ्या कारणाने! पत्रकार परिषदेत टेबलावरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडा नाराज झाला. त्याने दोन्ही बॉटल खाली ठेवून उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. कोको कोला या स्पर्धेचे प्रायोजक असूनही रोनाल्डोने त्याची पर्वा केली नाही. याबद्दल एकीकडे रोनाल्डोवर कौतुकाचा वर्षाव झाला, तर दुसरीकडे कोका कोला या अमेरिकन कंपनीचे शेअर मोठय़ा प्रमाणात घसरले. या वादाच्या पार्श्वभूमीवर फेविकॉल आणि अमूल या ब्रॅण्डने जबरदस्त ‘फ्री कीक’ हाणत स्वत:ची जाहिरात केली आहे. त्यांच्या क्रिएटिव्ह जाहिरातीने नेटीजन्स खूश झाले आहेत.

फेविकॉलने आज आपल्या ब्रँडची खास जाहिरात ट्विटरवर शेअर केली. या जाहिरातीत रोनाल्डोच्या पत्रकार परिषदेचे वातावरण आहे. टेबलावर माईक आणि त्याच्या शेजारी फेविकॉलच्या दोन बाटल्या ठेवल्या आहेत. यासोबत ‘न बॉटल हटेगी न व्हॅल्युएशन घटेगी’ अशी मजेशीर कॅप्शन लिहिली आहे. याशिवाय ‘हाय नी मेरा कोका कोका कोका’ अशी कॅप्शन टाकत फिरकी घेतली आहे. अमूल कंपनीनेही आपल्या प्रोडक्टची जाहिरात शेअर करत ‘नेव्हर बॉटलिंग असाईड’ म्हणजे अमूलला कधी साईड केले नाही, असा गंमतीशीर मजकूर लिहिला आहे.

तसं बघितलं तर देशी कंपन्यांच्या जाहिराती खूप क्रिएटिव्ह असतात. मात्र या वेळी देशी कंपन्यांनी विदेशी ब्रँडच्या नावाचा अप्रत्यक्ष वापर करून गंमत केली आहे.