परमबीर सिंह यांच्या आरोपाची चौकशी लवकरच सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 20 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चंदिवाल यांची एकसदस्यीय समिती 30 मार्च रोजी नेमली. या समितीचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे. माजी निवृत्त न्यायमूर्ती चंदिवाल यांचे यासाठी मानधन ठरविण्यात आले असून त्यांना उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींप्रमाणे प्रतिमाह वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कामकाजासाठी मुंबई उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे यांच्याकडे समितीचे प्रबंधन म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अॅड. शिशिर अहिरे हे समितीचे वकील, सुभाष शिखरे हे शिरस्तेदार, हर्षवर्धन जोशी हे लघुलेखक तर संजय कर्णिक यांना समितीचे कार्यालयीन अधीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.