दखल – आनंदाचा उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. सुरेश सावंत

एकनाथ आव्हाड हे एक प्रयोगशील असे ज्येष्ठ बालसाहित्यकार आहेत. एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचे वैशिष्टय़ असे की, त्यांच्या लेखनात तोचतोचपणा कधीच नसतो. त्यांची प्रत्येक कलाकृती ताजी-टवटवीत असते. व्यास ािढएशन्सने प्रकाशित केलेल्या ‘प्रकाशाचा उत्सव’ ह्या त्यांच्या नवीन बालकथासंग्रहात असाच नावीन्याचा अनुभव येतो. ‘कुसुमाकरचा सलाम’ ह्या कथेचा नायक आहे कवितेचा दिवा लावणारा शाळकरी मुलगा श्रीशान. तो छान छान कविता लिहून सगळ्यांना प्रभावित करतो. ‘माणसानं कमी बोलावं आणि जास्त ऐकावं. कमी लिहावं आणि जास्त वाचावं’ हा बोध ह्या कथेतून मिळतो. नामवंत कवींप्रमाणे श्रीशानने ‘कुसुमाकर’ हे टोपणनाव धारण केले आहे.

‘शब्दांची नवलाई’ हा एकनाथ आव्हाड यांचा अतिशय आवडीचा विषय. ‘नवलाई‘ ह्या कथेतील आईबाबा, शमी आणि बाळू ही चौकडी शब्दांचे भाषिक खेळ खेळते. ‘सत्य हे नेहमीच सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि सुंदर असतं. खोटं बोलणारा माणूस खोटं बोलून स्वतचाच विश्वासघात करत असतो. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी,’ असा विचार ‘सत्यमेव जयते’ ही कथा देते.

आव्हाडांची भाषा इतकी काव्यमय आहे, की ह्या प्रत्येक कथेत कविता एकरूप झालेली आहे. लालित्यपूर्ण भाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. ओघवत्या आणि लडिवाळ संवादातून ही कथा फुलत जाते. एकनाथ आव्हाड यांचा बालमानसशास्त्राचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांनी बालभावविश्व अतिशय प्रभावीपणे रेखाटले आहे. मूल्यसंस्कार बिंबविणाऱया ह्या कथा बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो.

शब्दांकन : शुभांगी बागडे