
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या अंदमानातील पोर्टब्लेअर येथील सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळाची वास्तू पूर्णत्वाला जावी यासाठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राला साद घातली आहे. या वास्तू उभारणीसाठी सावरकरप्रेमींना मदत करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी अंदमानात आलेल्या भूकंपात सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळाच्या वास्तूची वाताहत झाली होती. महाराष्ट्र मंडळाचे आजीव सदस्य व सल्लागार विष्णू गवळी, सचिव अरविंद पाटील यांच्या पुढाकाराने या वास्तूचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्याचा तळमजला, पहिला मजला, सभागृह व 12 खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित दोन मजल्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या वास्तूच्या उभारणीसाठी निधीची प्रचंड कमतरता जाणवत आहे. यापूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून केवळ खोटी आश्वासने देऊन फडणवीस सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप विष्णू गवळी आणि अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळाची वास्तू उभारताना मंडळावर पावणेदोन कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव सहकार्य करावे तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, सावरकरप्रेमींनी सावरकरांप्रति कृतज्ञता म्हणून आर्थिक मदत करावी, असे आवाहन एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – विष्णू गवळी 9734012436. नवीन पाटील- 9434283029.
बँक खात्याचा तपशील पुढीलप्रमाणे – Union Bank of India, A/c No. 638502010000189, Maharashtra Mandal Port Blair Andaman, IFSC. UBIN0 563854. Pin. 744101.





























































