अंधेरी पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर व्हेंटिलेटरवर

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले पूल दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यांना सर्जिकल आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अस्मिता यांच्यावरील उपचारांना अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याने डॉक्टरांसमोरही आव्हान उभे राहिले आहे.

पूल दुर्घटनेत अस्मिता यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. गँगरीनमुळे हात गमवावा लागू नये म्हणून ऍण्टीगँगरीन इंजेक्शने देऊन त्यांचा हात वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. गंभीररीत्या जखमी झाल्याने अस्मिता यांना अतिरक्तस्राव झाला. त्यांच्या मेंदूतही रक्ताचे टय़ूमर बनले. न्यूरोसर्जन्सनी ते पंक्चर करून पुढील उपचार केले आहेत. मात्र त्या पूर्ण शुद्धीवर आल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेतील जखमी मनोज मेहता यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक बनली असल्याचे समजते. गिरधारी सिंग आणि द्वारकाप्रसाद शर्मा यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्या हातांमध्ये रॉड बसवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या