चिन्ह आहे मशाल, विजय होईल विशाल! अंधेरी पोटनिवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकणारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व येथे होणारी पोटनिवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी विजयाची पहिली पायरी ठरणार आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली तरी यात दिलदारपणा वगैरे काही नाही, तर षड्यंत्र करत राहणे हाच त्यांचा उद्योग आहे. आताही ‘नोटा’च्या माध्यमातून मताधिक्य कमी करण्याचा डाव खेळताहेत. मात्र हा त्यांचा डाव उधळून लावून विक्रमी मताधिक्याने ही पोटनिवडणूक आपल्याला जिंकायची आहे, असे आवाहन शिवसैनिकांना करताना ‘चिन्ह आहे मशाल, विजय होईल विशाल’ असा नारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचाराची सभा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुंदवली येथील कामगार क्रीडा भवन येथे घेतली. या वेळी त्यांनी ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. आदित्य ठाकरे म्हणाले, ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यासाठी गणपती मंदिरापासून ते सुमारे दोन किलोमीटर पायी चालत जाऊन निवडणूक कार्यालयात पोहोचलो तेव्हा या शिवसैनिकांचा उत्साह पाहून तिथेच शिवसेनेच्या विजयाची खात्री पटली होती.

ही महिला सन्मानाची निवडणूक आहे

ही निवडणूक केवळ राजकीय पक्ष किंवा एका मतदारसंघाची नाही, तर ही महिला सन्मानाची निवडणूक आहे. ऋतुजा लटके यांचा फॉर्म भरायच्या एक दिवस आधीपर्यंत मुंबई महापालिका प्रशासन कसे त्यांच्यासोबत वागत होते याचा विचार करा. शिवसेनेची 25 वर्षे महापालिकेवर सत्ता आहे, मात्र याआधी कोणत्याही सरकारने महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचे आठवत नाही. अर्थात आधीचे सर्व मुख्यमंत्री अधिकृत होते आणि हे अनधिकृत आहेत. याआधी गुंडगिरी, दादागिरीची भाषा महापालिका, सरकारमध्ये झाली नव्हती. ती व्हायला लागली आहे. एखाद्या महिलेला सतवायचं, किती कशासाठी हे करायचं. हे घाणेरडं राजकारण आपण महाराष्ट्रात टिकू द्यायचं नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले. या वेळी विभागप्रमुख अनिल परब, शिवसेना उपनेते सचिन अहिर, अमोल कीर्तिकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे गुरुनाथ खोत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका राजुल पटेल, विधानसभा संघटक प्रमोद सावंत, रजनी मेस्त्री आदी उपस्थित होते. या वेळी मनसे पदाधिकारी सुमित समाणी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

ही निवडणूक फार मोठी आहे. ही निवडणूक आपली तयारी काय आहे हे दाखवणार आहे, आपला विजय किती मोठा आहे हे दाखवणारी आहे. सर्वांना वाटतंय की, ही निवडणूक बिनविरोध झालीय. पण निवडणूक बिनविरोध झालेली नाही. आपल्याला दिवसरात्र काम करावे लागणार आहे.

तुमचं घटनाबाह्य सरकार सत्तेत बसलं आहे. सर्व यंत्रणा तुम्ही वापरता आहात. ऋतुजा लटके यांच्याविरोधातही या यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्या यंत्रणेत कोणी कोणी त्यांना फोन केले, त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे आहेत माझ्याकडे. सरकार आल्यानंतर आपल्यालाही आपली यंत्रणा सजग करायचीच आहे.