
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे. आंगणेवाडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 10 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
आंगणेवाडीला जोडणाऱ्या काळसे कट्टा, मालवण-बेळणा, गोळवण-पोईप, ओझर-कांदळगाव- मागवणे मसुरे-बांदिवडे-आडवली-भटवाडी, राठीवडे-हिवाळे-ओवळीये-कसाल-ओसरगाव, चौके-धामापूर व कुमामे-नांदोस-तिरवडे-सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचे सुसज्जीकरण करण्यात येणार आहे.
बिळवस-आंगणेवाडी रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच चौके-आमडोस-माळगाव-मांगवणे-आंगणेवाडी रस्त्याला सिंधुदुर्ग जिह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा देण्यात आला आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर-चंदगड-तिलारी-दोडामार्ग रस्त्यावरील मोठय़ा धोकादायक पुलाची पुनर्बांधणीही करण्यात येणार आहे.




























































