आंगणेवाडीच्या यात्रेला येणाऱ्या चाकरमान्यानू… आरवली ते वाकेड प्रवास खडतर, पुढे सुसाट! उड्डाणपुलांजवळ वाहतूककोंडीची भीती 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला येणाऱ्या चाकरमान्यांनो, मुंबई-गोवा महामार्ग अजूनही प्रगतीपथावरच आहे. आरवलीपासून वाकेडपर्यंत तुम्हाला खडतर प्रवास करावा लागणार आहे. मात्र वाकेडपासून आंगणेवाडीपर्यंत तुमची गाडी सुसाट जाऊ शकते. महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील पुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

9 फेब्रुवारीपासून आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेला मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांना गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास करावा लागत आहे. यंदा काही ठिकाणी एक मार्गिका तर काही भागात रस्ता पूर्ण झाला आहे. चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे यापरिसरात वाहतूक कोंडी होते. आरवली ते कांटे दरम्यान 39.24 किमीपैकी 36.80 किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण व्हायला मार्च उजाडणार आहे. कांटे ते वाकेड दरम्यान 49.15 किमी अंतरापैकी 44.229 किमी काम पूर्ण झाले आहे. वाकेडपासून पुढील झारापपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

महामार्गाचे काम गेली 18 वर्षे रखडल्याने, गणपती असो, शिमगा असो चाकरमानी पर्यायी कोल्हापूर मार्गाचा अवलंब करतात. आता रस्त्याच्या कामात थोडी प्रगती आहे. चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. उड्डाणपूल वगळता रखडलेली कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग विभागाला आहे.

उड्डाणपूल रखडले 

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलांचे काम रखडले आहे. चिपळूण, संगमेश्वर, निवळी, पाली आणि हातखंबा येथील उड्डाणपुलांचे काम रखडल्याने त्या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील कामही सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. एकमेव राजापूरच्या उड्डाणपुलांवरून वाहतूक सुरू आहे.