
मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून शैक्षणिक पायाभरणी अंगणवाडीतच होते. पण अंगणवाडय़ांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागासह ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केले आहे. जिह्यात दोन हजार 504 अंगणवाडय़ा डिजिटल असल्याची नोंद आहे. पैकी 543 अंगणवाडय़ा वगळता 5 हजार 93 अंगणवाडय़ांना लाइट कनेक्शनच नाही. त्यामुळे डिजिटल शब्द फक्त कागदावरच उरला आहे.
नगर जिह्यात पाच हजार 664 अंगणवाडय़ा आहेत. या अंगणवाडय़ांत जिह्यातील तीन ते सहा वयोगटातील सुमारे 1 लाख 60 हजार विद्यार्थी दाखल आहेत. 2 हजार 504 अंगणवाडय़ा डिजिटल असल्याची जिल्हा परिषदेच्या दप्तरी नोंद आहे. मात्र, अंगणवाडी डिजिटल असेल तर तेथे किमान वीज कनेक्शन, एलईडी व संगणकीय साधने आवश्यक आहेत; परंतु जिह्यातील 5 हजार 634 अंगणवाडय़ांपैकी 5 हजार 93 अंगणवाडय़ांना वीज कनेक्शन नसल्याचे समोर आले. वीज व पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तथापि, ग्रामपंचायतींनीही या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. अंगणवाडय़ांचे लाईट बिल भरण्याची तरतूदही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे नाही. अथवा इतर कोणतेही लेखाशीर्ष नाही. त्यामुळे प्राथमिक पूर्व शिक्षण देणाऱया बहुतांश अंगणवाडय़ा कागदावर डिजिटल राहिल्या आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कधी मिळणार?
ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता केंद्र व राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. नगर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला राहावा यासाठीही अनेक वेळेला प्रयत्न झालेले आहेत. तर, अंगणवाडी शाळांचा दर्जा हा सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले गेले; पण त्याला म्हणावे तसे यश आले नाही. जिह्यातील अनेक अंगणवाडय़ांना आजही स्वतःची इमारत नसल्याचे विदारक वास्तव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वीज
बिल भरण्याची तरतूद नाही
जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण हा एक स्वतंत्र विभाग अस्तित्वात आहे. तसेच स्वतंत्र महिला व बालकल्याण सभापती हे पद लोकप्रतिनिधींकडे आहे. तथापि, प्रशासकीय व राजकीय अनास्था असल्याचे दिसून येते. वीजबिल भरण्याची तरतूदच केली जात नाही. तसे लेखाशीर्षही करण्याची तसदी कोणी घेतली नाही. जिह्यात 21 प्रकल्प आहेत. तेथे प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. या प्रकल्पांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 541 अंगणवाडय़ांनाच वीजजोड असल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित 5093 अंगणवाडय़ांना वीजजोड का मिळाले नाही, याची तसदी मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
5634 एकुण अंगणवाडय़ा
541 वीज कनेक्शन
5093 वीज कनेक्शन नाही
2504 कागदावर डिजिटल



























































