अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

प्रतिकात्मक छायाचित्र

मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅच्युईटी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील 2 लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा 49वा दिवस आहे. संपाला इतके दिवस उलटून गेले तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचारही झालेला दिसत नाही. 3 जानेवारी रोजी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमत्र्यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली, मात्र त्यानंतरही अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही.

आज कृती समितीच्यावतीने दादर खोदादाद सर्कल ते वडाळा विठ्ठल मंदिर येथे दिंडी काढण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी या दिंडीला परवानगी दिली नसल्याचा आरोप कृती समितीचे निमंत्रक राजेश सिंग यांनी केला. अखेर शेकडो अंगणवाडी सेविकांनी विठ्ठल मंदिरात सरकारविरोधी घोषणा दिल्या. दरम्यान, ‘मागण्यात होत नाहीत तोपर्यंत आजाद मैदान सोडणार नाही, असा प्रवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.

मोर्चाला पोलीस परवानगी देत नाही

संपाचा पुढचा टप्पा म्हणजे कृती समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार होते. पण पोलीस मोर्चाला परवानगी देत नाही, असेही सिंग यांनी सांगितले. लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी उठवलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याबद्दल कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला.