
नेहमी मद्यपान करून घरी वाद घालत आईला शिवीगाळ करणारे वडील शेतात एकटे असल्याचे बघून मुलाने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या केली आहे. मुलानेच वडिलांची क्रूरपणे हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात घडली आहे.
पिंपळनेर परिसरामध्ये वास्तव्यास असणारे किसन अंबादास तागड ( वय 60) हे दारूच्या नशेत घरात वाद घालत असत. नेहमी आपल्या पत्नीला शिवीगाळ करत असत. त्यांच्या या सततच्या त्रासाला कुटुंब कंटाळले होते. अखेर मंगळवारी ते शेतात एकटे असल्याचे पाहून मुलगा लहू किसन तागड याने कोयत्याने सपासप वार करून वडिलांचा खून केल्याची घटना घडली. या घटनेने पिंपळनेर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधिक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाणयाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































