
सामना ऑनलाईन । मुंबई
‘नवोदित मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरण्यापूर्वी ज्या शरीरसौष्ठवपटूचं कुणी नावही ऐकलं नव्हतं असा हर्क्युलस जिमचा अनिल बिलावा देशातील सर्वात प्रतिष्ठsच्या स्पर्धेत उतरला आणि त्याने संभाव्य विजेत्यांवर सहजगत्या मात करून ‘स्पार्टन मुंबई श्री’ चे जेतेपद निर्विवादपणे पटकावण्याचा पराक्रम केला. मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात ‘नवोदित मुंबई श्री’ जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून ‘मुंबई श्री’ जिंकणारा अनिल बिलावा हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे.
अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मिळ असा इतिहास रचला. तसेच महिलांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या ‘मिस मुंबई’ स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली तर पुरुषांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकाराच्या 170 सेंमी उंचीच्या गटात आरकेएमचा महेश गावडे व 170 सेंमीवरील उंचीच्या गटात बालमित्र व्यायामशाळेचा शुभम कांदू अव्वल ठरला बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग तसेच फिटनेस असोसिएशनने दिलेल्या आयोजनाच्या संधीचे आरोग्य प्रतिष्ठानने अक्षरशः सोने केले.



























































