
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. संजय धनराज नारनवरे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. नारनवरे यांच्या बाईकला ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
नागपूरमधील सिव्हिल लाईन्स भागात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बंगला आहे. पोलीस अंमलदार संजय नारनवरे या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. बुधवारी रात्री मोटरसायकलने कर्तव्यावर हजर राहण्यासाठी ते घरुन निघाले. मात्र नांदगाव फाटा परिसरात (एमएच-40-बीएल-7968) या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. आरोपी ट्रकचालकाला अटक करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी लावली आहे.
गृहमंत्र्यांचे भावूक ट्वीट
‘माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे’, असे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.
माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे. pic.twitter.com/8zmrR0Tjkn
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 17, 2021































































