
मला मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडून आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतूपोटी सुरू आहे. मी गृहमंत्री असताना मध्यला काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असू शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सीबीआय व ईडीच्या माध्यमातून होत आहे. पण एक आहे ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजीत नही’ असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा अनेक योग्य निर्णय घेतले. सीबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून योग्य तपास सुरू केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असू शकते. त्यामुळेच सीबीआय आणि ईडीच्या मार्फत माझी चौकशी सुरू आहे. ज्या पद्धतीने मी सीबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पद्धतीने ईडीलासुद्धा करणार, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
























































