अधिवेशनाचा कालावधी फक्त 10 दिवसांचा; हा विदर्भावर अन्याय

अवकाळी पावसामुळे अवघ्या राज्यातील शेतीचा अक्षरशः चिखल करून टाकला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे शेती मातीत गेली. बळीराजा पुरता हवालदिल झाला असून त्याच्या गळय़ाभोवती कर्जाचा फास आणखी आवळला गेलाय. इतरही अनेक प्रश्न राज्यापुढे आहेत. अशा स्थितीत अधिवेशनाचा कालावधी केवळ 10 दिवसांचा (सुट्टय़ा वगळून) ठेवण्यात आले आहे. इतक्या कमी कालावधीत प्रश्न कसे सुटतील, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच हा विदर्भावर अन्याय असल्याचे सांगत सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.

विदर्भातील जनतेच्या प्रश्नांना वाचा पह्डण्यासाठी, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. मात्र या अधिवेशनाचा कालावधी हा केवळ 10 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. त्यादेखील सुट्टय़ा वगळून. राज्यापुढे अवकाळी पावसासह सुरक्षा, शिक्षण, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. असे असताना इतक्या कमी कालावधीत हे सर्व प्रश्न कसे सुटतील याकडे अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. विदर्भातील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध करतो, असे अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून म्हटले आहे.