पाच ते दहा वेळा धनुष्यबाणाचे बटन दाबले तरी मत कमळालाच! अनिल गोटे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करूनच भाजपने हा विजय मिळविल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. निवडणुकीपूर्वी मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तेव्हा अधिकाऱयांनी ‘धनुष्यबाण’चे दहा वेळा बटन दाबले, मात्र ही दहा मते भाजपच्या कमळ फुलाला गेली. याची लेखी तक्रार आम्ही तेव्हाच केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचेही गोटे म्हणाले.

धुळय़ात भाजपलाच आव्हान देत आमदार गोटे यांनी ‘लोकसंग्राम’ पक्षातर्फे उमेदवार उभे केले होते. लोकसंग्रामचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले. गोटे यांची पत्नी विजयी झाली, मात्र मुलाला पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोटे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर सायंकाळी त्यांनी दोन पानी पत्रही सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा भाजपचा नाही, पक्षातील गुन्हेगारांचा विजय!
धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपचा नसून पक्षातील गुन्हेगारांचा आहे असा हल्ला आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. धुळेकरांनी आमच्या ‘लोकसंग्राम’ पक्षाला मत दिले, पण ईव्हीएम मशीनने मात्र भाजपला मत दिले असे भाजपच्या विजयाचे टीकात्मक विश्लेषणही गोटे यांनी केले.

वाजपेयींचा हा भाजप आहे का?
धुळय़ातील विजय हा भाजपला आपला वाटत असला तरी तो त्यांचा नाही. कारण 62 पैकी 57 उमेदवार यांनी आयात केले. त्या 57 पैकी 28 जण गुन्हेगार आहेत आणि 14 उमेदवार तर हार्डकोअर हिस्ट्री शीटर आहेत. आता या विषयाला भाजपचा विजय म्हणायचा का, गुन्हेगारांना घेऊन निवडणूक लढवणारा हा भाजप खरेच अटलबिहारी वाजपेयीं यांचा आहे का? असा सवाल गोटे यांनी केला.

गुंडांना पक्षात घेणारे आणि त्यांच्या बळावर सत्ता मिळवणारे महाराष्ट्रातील लोकांना काय देणार अशी टीका करून गोटे म्हणाले, ज्या लोकांनी 20-25 वर्षे पक्षकार्य केले त्यांना उमेदवारी न देता मुख्यमंत्री, दानवे आणि महाजन यांनी गुंडांना उमेदवारी दिली. हे तिघेही जण महाराष्ट्राला एका विनाशाकडे घेऊन चालले आहेत.

ईव्हीएममध्येच घोळ
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करूनच भाजपने विजय मिळविला आहे, असा स्पष्ट आरोप गेटे यांनी केला. जेव्हा निवडणुकीपूर्वी या मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तेव्हा भाजपचा एकही पदाधिकारी हजर नव्हता. म्हणजे मशीनमध्ये नंतर आपण घोळ करू, अशी त्यांना खात्रीच होती, असेही गोटे म्हणाले.

भाजपने पैसे वाटले
या निवडणुकीत भाजपने 100 कोटी रुपये वाटल्याचा आरोप गोटे यांनी केला. मतदानाच्या आदल्या दिवशी रेशन दुकानाप्रमाणे लाइन लावून पैसे वाटले. भाजपला महाराष्ट्रात ही संस्कृती आणायची आहे का, असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली
कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, गुंडांना देऊ नका एवढेच माझे भाजपकडे मागणे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली म्हणूनच नाइलाजास्तव ‘लोकसंग्राम’ला निवडणुकीत उतरावे लागले, असे गोटे म्हणाले. गिरीश महाजन हे खोटारडे आणि भामटे असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवद्रोही, तडीपार छिंदमला ईव्हीएम ‘पावले’
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त व्यक्त करणारा आणि निवडणुकीत तडीपार केलेला श्रीपाद छिंदम याला ईव्हीएम मशीन अखेर पावले. मतमोजणीत प्रारंभी पिछाडीवर पडलेल्या छिंदमने शेवटी आघाडी घेत विजय मिळविला. प्रभाग 9 (क)मधून छिंदम याने अपक्ष निवडणूक लढविली होती. काल मतदान सुरू होण्यापूर्वी छिंदमचा भाऊ श्रीकांत याने ईव्हीएमची पूजा केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आज श्रीकांत याला अटक केली आहे.

कोल्हापुरात भाजप- ताराराणी आघाडीला शह
कोल्हापूर महानगरपालिकेत आज सहा महिन्यांच्या कालावधीसाठी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक झाली. यात आघाडीच्या राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची महापौरपदी निवड झाली. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीतील भाजपच्या जयश्री जाधव यांचा 33 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे भूपाल शेटे यांची उपमहापौरपदी निवड झाली.

यवतमाळमध्ये नेर पालिकेवर भगवा! नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनीता जयस्वाल
नागपूर- राज्यात धुळे, नगर महानगरपालिकांच्या निवडणुकांसोबत काही ठिकाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठीही निवडणुका झाल्या. यात यवतमाळ जिह्यातील नेर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथे शिवसेनेस 18 पैकी 9 जागा मिळाल्या. शिवाय थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत येथे शिवसेनेने बाजी मारली. नगराध्यक्षपदी सुनीता पवन जयस्वाल विजयी झाल्या. त्याबरोबरच जळगावातील शेंदुर्णी, नांदेडमधील लोहा आणि नागपुरातील मौदा नगर पालिकेतील नगराध्यक्ष पद भाजपने तर चंद्रपुरातील ब्रम्हपुरीच्या नराराध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार विजयी झाला. वाशीममधील रिसोड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद जनआघाडीने मिळवले.