अनिल कपूर पुन्हा साकारणार नायक

अभिनेते अनिल कपूर यांच्या नायक या पॉलिटिकल ड्रामाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. चित्रपटात अनिल कपूर यांनी साकारलेली मुख्यमंत्री शिवाजीराव गायकवाड ही व्यक्तिरेखा आजही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता तब्बल 23 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे ‘नायक’चे दिग्दर्शक एस. शंकर आणि अनिल कपूर नुकतेच मुंबईत एकत्र स्पॉट झाले. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल झाले असून आता हे दोघे ‘नायक 2’साठी पुन्हा सोबत काम करणार का, हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. 2001 साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट एस. शंकर यांच्या ‘मुधलवन’ या तमीळ चित्रपटाचा रिमेक होता. ‘नायक’मध्ये राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लिव्हर यांनी भूमिका केल्या होत्या.