
एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेले आमदार अपात्र आहेत. त्यांना अपात्र ठरवण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा या कार्यक्रमातून अनिल परब यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, परबांनी हे आरोप फेटाळले असून जाणीवपूर्वक भाजपकडून त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. नुकतेच शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्या व्हिडिओतून अनिल परब यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांचा विचार आणि वारसा घेऊन जाणार म्हणत काही लोकं गुवाहटीला गेले. पण, गुवाहटीला गेलेल्या 40 आमदारांपैकी 25 जणांनी नावे मी सांगू शकतो, ज्यांचा बाळासाहेबांसोबत कधीच संबंध आला नाही. अशी लोकं बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय, असं सांगत आमच्यापासून दूर गेल्याचे परब यांनी म्हटलं. मातोश्री आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
आवाज कुणाचा!
पॉडकास्ट शिवसेनेचा!भाग पहिला –
सत्तासंघर्षाची कायदेशीर बाजू, गद्दारांचं काय होणार?ॲड. अनिल परब
प्रवक्ते, आमदार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उद्या ७ जून, सायं. ५ वाजता
आजच सबस्क्राईब करा- https://t.co/6glEEipiH9 pic.twitter.com/qvWAahsIL5
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 6, 2023
शिंदे गटाच्या सगळ्या शेंड्या भाजपच्या हातात दिल्या आहेत. ते उठ म्हटलं की उठायचं अन् ते बस म्हटलं की बसायंच, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे, असे म्हणत अनिल परब यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, शिंदे गटाच्या 16 आमदारांना आणि उर्वरीत 23 आमदारांना अपात्र करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असेही परब यांनी म्हटलं आहे. या पॉडकास्टचा शॉर्ट व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. त्यात, त्यांनी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला.



























































