रामदास कदम यांनी मंत्रीपदावर असताना केलेले बारा ते तेरा घोटाळे बाहेर काढणार, अनिल परब यांचा घणाघाती आरोप

शिंदे गटाचे रामदास कदम हे मंत्रीपदावर असताना त्यांनी सरकारी अधिकाऱयांना हाताशी धरून घोटाळे केले आहेत. त्यांनी केलेले बारा ते तेरा घोटाळे बाहेर काढणार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते अनिल परब यांनी आज केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनिल परब यांनी मिंधे गटावर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी खेडमधील एका भूखंडाचा दाखला दिला. मिंधे गटाचे रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना अनिल परब म्हणाले की, रामदास कदम यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला. यात शासकीय अधिकाऱयांचा सहभागाशिवाय हे घोटाळे होऊच शकत नाही. मी रामदास कदम यांचे बारा ते तेरा घोटाळे बाहेर काढणार आहे. यातील दोन प्रकरणांची कागदपत्रे मी किरीट सोमय्या यांना देणार आहे. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे अण्णा हजारे आहेत. त्यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घोटाळय़ाची चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

भाजपने मध्यंतरी सर्व्हे केला. यामध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांबाबत सर्व्हे नाकारात्मक आलेला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब म्हणाले की, संजय शिरसाट यांना आता कळेल की, शिवसेना व शिंदे गटात किती फरक आहे. आम्ही त्यांना शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली होती. त्यामुळे जे आज इतक्या मोठय़ा पदावर जाऊन बसले आहेत. आमच्याकडे सर्व्हे करून उमेदवारी दिली जात नाही, असा टोला त्यांनी लगावला.

…मग शिंदे गटाची विधानसभेला काय अवस्था होईल

ठाण्याची जागा आनंद दिघे यांनी शिवसेनेकडे खेचून आणली होती. आता जागावाटपात ठाण्याची जागा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शिंदेंवर विश्वास ठेवून 13 खासदार व आमदार सोबत गेले आहेत. त्यांना निवडून आणले नाही तर राजीनामा देऊन गावाकडे जाऊन शेती करेन असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 13 जागा वाचवून तरी दाखवाव्यात. त्यानंतर निवडून आणण्याची भाषा करावी. त्यांच्यासोबत गेलेले कृपाल तुमाणे यांचे तिकीट कापले आहे. हेमंत गोडसे, भावना गवळी यांना तिकीट जाहीर झालेले नाही. हेमंत पाटील यांना बदलण्याची चर्चा सुरू आहे. खासदारांच्या 13 जागांसाठी शिंदे गटाची ही परिस्थिती आहे. मग विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पन्नास जागांसाठी काय हाल होतील, असा टोला परब यांनी लगावला.