एकनाथ शिंदे खुर्ची वाचवण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांच्या गैरकृत्यावर पांघरून घालत आहेत, अनिल परब यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आज सावली डान्सबार प्रकरणातील पुरावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

”योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने सुरू असलेल्या डान्सबारचा विषय मी उपस्थित केला होता. या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळली जातेय. यापूर्वी या डान्सबार वरती 2023 मध्ये छापे झालेले, त्या बारमध्ये मे महिन्यात झालेली धाड, त्या धाडीत पकडलेल्या बारबाला, तेथील गिऱ्हाईक, त्या कारवाईच्या चार्जशीटची कॉपी, त्या बारचं लायसन्स, 2023 च्या छाप्यांचे पंचनामे,डान्सबारची माहिती, डान्सबारचे कायदे या सगळ्याची व्यवस्थित मांडणी करून त्याचे पुरावे, खेडमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या उपसा वाळूचे फोटो, व्हिडीओ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती दिले आहेत. पुराव्यांची योग्य ती दखल घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

”एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांचे समर्थन करत आहेत. धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेनी त्यांची प्रतिमा अशी दाखवली होती की, त्यात आनंद दिघेंनी डान्स बारवर कारवाई करायला सांगितल्यानंतर त्यांनी डान्स बार तोडल्याचे दाखवलेले. मला त्यांना विचारायचं आहे की हे तेच एकनाथ शिंदे आहेत का? तेच एकनाथ शिंद डान्स बारला समर्थन देत आहेत का? एकनाथ शिंदे आपल्या तत्वाशी प्रामाणिक नाही, त्यामुळे आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते आपल्या आमदारा मंत्र्यांच्या गैरकृत्यावर पांघरून घालत आहेत. आता त्यांनी स्वत:च सांगावं की धर्मवीर चित्रपटातले एकनाथ शिंदे खरे की आताचे समर्थन करणारे एकनाथ शिंद खऱे आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.