
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावावर असलेला सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना आज परत केला. यावरून शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. चोरीचा माल परत केला म्हणून चोर सुटत नाही, असे सांगत त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला म्हणजे ते या प्रकरणातून सुटले असे होत नाही. काल आपण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आज त्यांनी परवाना परत केला. काही अवैध केले नाही तर मग परवाना परत का केला? म्हणजेच सावली बारमध्ये बेकायदेशीर काम सुरू होते असे त्यांनी मान्यच केले आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होण्याआधी चोराने चोरीचा माल परत केला म्हणून त्याची सुटका करता येणार नाही. डान्स बारवर छापा पडतो तेव्हा बारचालक, मॅनेजर यांच्यासह परवानाधारकावरही कारवाई केली जाते, मग सावली बारप्रकरणी तशी का झाली नाही, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत
मुख्यमंत्र्यांनी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर ते हतबल आहेत असा संदेश महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र हतबल होईल. त्यामुळे त्यांनी कणखरपणा दाखवून योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय राठोड यांसारख्या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट मत अनिल परब यांनी मांडले.
कोकाटेंवर जुगाराची कलमे लावली पाहिजेत
माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबाबतही अनिल परब यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. कोकाटेंचे खाते बदलले म्हणजे त्यांना सूट दिलीय. कोकाटेंचा आदर्श घेऊन मुलांना जुगारी बनवणार आहात का… ?, रमीपटू तयार करणार आहात का…? जुगाराची कलमे त्यांच्यावर लावली पाहिजे होती, असे ते म्हणाले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत अनिल परब यांना यावेळी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, तेलंगाणातील पक्षांतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना 90 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश कालच दिले आहेत. शिवसेनेच्या प्रकरणात मात्र त्या वेगाने सुनावणी घेतली जात नाही. तरीही शिवसेनेला न्यायदेवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे, असे अनिल परब म्हणाले.