
सामना प्रतिनिधी । पुणे
अवनी वाघिणीचे प्रकरण हाताळण्यात वनखाते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अपयश आले असा आरोप पुण्यातील वाईल्ड या प्राणीमित्र संघटनेने केला आहे. तसेच अवनिची केलेली निघृण हत्या व तिच्या पिल्लांना पकडण्यात आलेले अपयश यामुळे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्या पदावरुन हकालपट्टी करावी, या मागणीसाठी वाईल्ड संघटना व पुण्यातील अनेक प्राणीप्रेमींनी रविवारी मोर्चा काढला.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेलेल्या या प्रकरणात अवनी वाघिणीचा बळी देण्यात आला व तिच्या आठ ते दहा महिन्यांच्या दोन पिल्लांचाही बळी देण्याच्या तयारीत वनखाते असल्याने या प्रकरणामागे अनेकांचे अनेक हेतू आहे असा आरोप संघटनेने यावेळी केला.
या कारणास्तव पुण्यातील प्राणीप्रेमी संघटनांतर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी रविवारी संभाजी बागेपासून ते संभोली बाग, जंगली महाराज रोड, डेक्कन, एफ सी रोड, फर्गुसन कॉलेज असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात प्राणीप्रेमी सहभागी झाले होते.



























































