पार्थ पवारांना क्लीन चिट देताच येणार नाही!

मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात त्यांना कुठलीही क्लीन चिट देता येणार नाही. पोलीस डायरीमध्ये त्यासंदर्भात वेगळ्याच नोंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले. मुंढव्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवारचा नेमका सहभाग काय हे तपासण्यासाठी त्यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ तपासण्यात यावेत तसेच अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

घोटाळ्याशी संबंधित तहसीलदार सूर्यकांत येवले यांना मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त करून दामानिया म्हणाल्या, येवलेंना कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव उघड झाले असते. हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेंना जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी आता तातडीने न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्यांना अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव वदवून घ्यावे, असे दमानिया म्हणाल्या. या वेळी दमानिया यांनी पोलीस डायरीतील नोंदींचे वाचन करून गंभीर बाबी समोर आणल्या. त्या म्हणाल्या, आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. 16 जून 2025 दुपारी 4 वाजून 28 मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलीस ठाण्यात हे कळवण्यात आले की, अ‍ॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करून आमच्या सिक्युरिटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत. त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो होतो असे त्या म्हणाल्या.