
पुण्यातील अमेडिया कंपनीच्या जमीन घोटाळय़ात पार्थ पवार हे दोषी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 24 तासांत राजीनामा घ्या, नाहीतर दिल्लीत अमित शहा यांच्या दारात जाऊन बसेन, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला दिला.
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. हा जमीन व्यवहार होत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ती माहिती पालकमंत्री अजित पवार यांना दिली होती की नाही?, तहसीलदारांनी जमिनीची विक्री झाल्याचे कळवले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या परवानगीविषयी सांगितले नव्हते का, अशी विचारणा दमानिया यांनी केली आहे.
या जमीन व्यवहार घोटाळय़ाबाबतची सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत असल्याचे सांगतानाच या प्रकरणात शीतल तेजवानी, येवले, दिग्विजय यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणीही दमानिया यांनी केली.
एसआयटी रद्द करा, अधिकारी पुण्याचेच
याप्रकरणी चौकशीसाठी सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमले आहे, परंतु त्यात पाच अधिकारी पुण्याचेच असल्याने चौकशी पारदर्शक होणार नाही. त्यामुळे ही एसआयटीच रद्द केली जावी अशी मागणी यावेळी दमानिया यांनी केली. अजित पवार पदावर आहेत तोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार नाही, त्यामुळे त्यांना पदावरून बाजूला करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

























































