“भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या व्यक्तिला भेटण्यासाठी अमित शहा वेळ देत नाहीत, पण…”, अंजली दमानियांचा संताप, फडणवीसांनाही इशारा

माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी मंत्रि‍पदाची राजीनामा दिला. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची माळ पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. या भेटीवर आणि मंत्रि‍पदाच्या चर्चांवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परखड शब्दात ट्विट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले.

‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत. पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. या काय ते समजून जा….भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, असे अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करून म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांची अमित शहा यांना विशेष विनंती; दिल्ली भेटीतील गुपित आलं बाहेर

ज्या धनंजय मुंडेंवर बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, Mahagenco मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, आवदा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे आरोप आहेत, कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, दहशत, बंदुकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणी म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मिक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपाचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे. जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असा संताप अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.