
वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम या मंत्र्यांची कुंडलीलीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज बाहेर काढली. कोकाटेंच्या संपत्तीमध्ये दहा वर्षांत अनेक पटींनी वाढ होऊन ती 48 कोटींवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे यांच्यासारखे लोक राजकारणात फक्त पैसा कमवायला येत आहेत, कोकाटे यांनी 26 वर्षांत आठ वेळा पक्ष बदलला आहे. 2014 मध्ये कोकाटे यांच्याकडे 6 कोटी रुपयांची संपत्ती होती. 2019 मध्ये ती 21 कोटींवर आणि 2024 मध्ये 48 कोटींवर पोहोचली, अशी माहिती दमानिया यांनी दिली.
गृह राज्यमंत्र्यांविरोधात न्यायालयात जाणार
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या योग सिद्धी, सिद्ध योग नावाने अनेक संस्था आणि कंपन्या आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. रत्नागिरीतही त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. कदम कुटुंबीयांनी केलेल्या गैरव्यवहाराची प्रचंड माहिती आपल्याकडे आली असून ती सर्व आपण न्यायालयातच ठेवणार आहोत, असा इशाराही दमानिया यांनी दिला.