ललित – मनाचिये गुंती…

>> अंजुषा पाटील

मन ही दोनच अक्षरं, पण आपलं जीवन अखंड व्यापून टाकतात.
‘‘मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?’
या मनाला कोण आवरणार? या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्लोक’ सांगितले आहेत. अनेक थोर संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक व वेगवेगळ्या क्षेत्रांतील मंडळींनी मनाचा शोध घेतला आहे. तरी आजही या मनाचा थांग कुणालाच लागला नाही.
बहिणाबाई चौधरी यांनी मनावर बऱ्याच कविता लिहून ठेवल्या आहेत.
‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर…
मन ढोर, मन मोकाट, मन लहरी, मन जहरी,
मन पाखरू, मन चप्पय, मन एवढं एवढं
देवा आसं कसं मन? आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपनी तुले, आसं सपान पडलं’
या मनाचा काही अर्थ लागत नाही म्हणून बहिणाबाई देवालाच प्रश्न विचारते, ‘‘देवा, तू अगाध जादूगार आहेस. तुझी ही करामत आश्चर्याचा गोड धक्काच आहे. मन प्रत्येकालाच आहे, पण कुणालाच त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. असं हे मन.
आपण म्हणतो, माझ्या मनातच नव्हतं की, आज बाहेर पडावं. ती माझ्या मनातून उतरली. ती साडी माझ्या मनात भरली, पण माझं मन मला सांगते ना, मन आज कातर झालं, मन समेवर आलं…अशी विधानं आपण सहजपणे करतो.
तरीही हे मन खूप सुंदर आहे.
‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची…
तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कशाची
पर्वा बी कुनाची?
अशा प्रकारची मनाची वर्णनं आपण करतो, वाचतो, ऐकतो, पण कधी कधी या मनात संकल्प विकल्प येतात, निर्णय चुकतात. आपण संभ्रमात पडतो. तेव्हा मात्र बहिणाबाईंनी केलेलं मनाचं वर्णनच खरं वाटू लागतं.
मन संकल्प करते. मनात अनेक विचार येतात. मनाची गोंधळलेली मनःस्थिती दूर करण्यासाठी अष्टांग योगाचा विचार करायला हवा. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, समाधानी मन यांचा अंगीकार करायला हवा.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.’
आपल्या कष्टाने, प्रयासाने काही साध्य करायचं असेल तर प्रथम मन प्रसन्न केले पाहिजे. मन शांत, स्वस्थ ठेवलं पाहिजे. प्रसन्न मनात चांगले विचार येतात, यशस्वी होतात आणि चिरकाळ टिकतात.
समर्थ रामदास हेच पहिले मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. ‘मनाच्या श्लोकां’तून त्यांनी मनाला उपदेश आणि उपाय सांगितले आहेत आणि ते कालातीत आहेत. आजही त्यांचा उपयोग होतो.
आज अनेक डॉक्टर, मानसतज्ञ आहेत तरी या मनावर 100 टक्के काबू करणारे कोणीही मिळाले नाहीत.
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा शरीरापेक्षा मन जास्त थकते. मन खंबीर असेल तर मनाचं सामर्थ्य भक्कम राहते आणि कोणताही दुर्धर आजार बरा होण्यास मदत होते. यासाठी या मनाला भक्तीचे संस्कार द्यायला हवेत. मनाला सकारात्मक विचारांचे वळण लावून विधायक कामात गुंतवून ठेवले पाहिजे. ‘रिकामं मन सैतानाचं घर’ असं म्हणतात ते उगीच नाही. या चंचल मनाला कसं स्थिर करायचं ते समर्थ आपल्याला नीटपणे ‘मनाच्या श्लोकां’तून समजावून सांगतात. लहान मुलांना कोवळ्या वयात ‘मनाचे श्लोक’ पाठ करायला शिकवले तर ते संस्कार कायम टिकतात, रुजतात आणि आयुष्यभर लक्षात राहतात. थोडय़ा प्रमाणात का होईना, अशी व्यक्ती मनावर नियंत्रण करू शकते. म्हणून मनावर योग्य वेळी योग्य संस्कार केले तर ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते.
मन हा विचार आणि भावनांचा कारखाना आहे. दररोज अगणित विचार आणि भावनांचे उत्पादन होत असते. या भावनांचे योग्य नियोजन करून मनाचा गुंता ज्याचा त्यानेच सोडवला पाहिजे.
“‘मनाचिये गुंती, गुंफेयेला शेला
बाप रखुमादेवीवरी, विठ्ठल आणिला
मोगरा फुलला। मोगरा फुलला।।’
मनाचा मोगरा फुलून त्याचा जीवनरूपी सुगंध आयुष्यभर दरवळण्यासाठी मनाला योग्य वेळी योग्य वळण लावू या.