
सामना प्रतिनिधी । पारनेर
लोकपाल, लोकायुक्तांच्या मागणीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील निर्णय अद्याप झालेला नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत उशिरा झालेल्या ग्रामसभेत सांगितले. दोन मंत्री येऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राळेगणमध्ये शासकिय अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी, चूल तसेच गाव बंद ठेऊन नागरिकांनी जनावरांसह यादवबाबा मंदीरासमोर ठिय्या देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
28 तारखेपर्यंत सर्च कमिटी नेमणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यावर आपण समाधानी नाही. सरकारला आम्ही सांगितलंय ठोस निर्णय देणार असेल तरच या, असे हजारे यांनी ग्रामसभेत सांगितले. जाणकार आल्याशिवाय प्रश सुटणार नाही, आता आलेले मंत्री जाणकार नाहीत, मंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजूनही अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. ठोस निर्णयशिवायच उद्या परत आले तर काही उपयोग नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास एवढा वेळ का लावला, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांशी अनेक वेळा चर्चा झाली. मात्र ठोस निर्णय झाला नाही. अजून पाच दिवस आपल्याला काही होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ग्रामसभेला सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध केला. हजारे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेलेल्या मोर्चाप्रसंगी जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यास आले नाहीत, त्याचा ग्रामसभेत निषेध करण्यात आला. शिष्टाचारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले नसले तरी यापुढील काळात असे शिष्टाचार दूर ठेऊन नागरिकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असे मत हजारे यांनी व्यक्त केले. नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर येत आहे, असे ते म्हणाले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याचे मंत्री गिरीष महाजन सांगत असले तरी शेतकरी टोमॅटो, कांदे, दूध आदी रस्त्यावर का फेकत आहे असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय झालाच पाहिजे असे सांगताना स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाचा मंत्र्यांनीच अभ्यास नसेल तर शेतकरी वर्गाला न्याय कसा मिळणार ? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारचे नाक दाबावे लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कृषी खात्याचे सचिव तसेच तज्ज्ञ समाजसेवकांच्या उपस्थितीत मंगळवारी राळेगणसिद्धीत बैठक होईल, या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे हजारे यांनी स्पष्ट केले.
हजारे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे प्रसारमाध्यमांशी चर्चा करून ग्रामसभेस सामोरे न जाताच गूपचूप निघून गेले. रविवारी हजारे यांच्या भेटीस आलेल्या महाजन यांच्यावर हजारे समर्थकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने उत्तरे देताना त्यांची गाळण उडाली होती. त्यामुळे समर्थकांच्या रोषाला सामोरे जाण्याऐवजी निघून जाणे दोघाही मंत्र्यांनी पसंत केले.


























































