लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या वादात पडणार नाही – अण्णा हजारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तहसीलदार देवरे प्रकरणात आमदार नीलेश लंके आणि तहसीलदार देवरे यांचे म्हणणे मी ऐकून घेतले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱयांच्या वादात मला पडायचे नसल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींवर आरोप करीत आत्महत्या करण्याचा इशारा ध्वनिफीतीद्वारे दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी हजारे यांची भेट घेऊन देवरे यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल दाखवला. देवरे यांनी रविवारी हजारे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, राज्यपातळीवरील वरिष्ठ अधिकाऱयांकडून चौकशी व्हावी अशी अपेक्षा तहसीलदार देवरे यांनी हजारे यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केली.

आमदार नीलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे या दोघांचेही म्हणणे आपण ऐकून घेतले. मात्र, मला या वादात पडायचे नाही. हा प्रशासकीय चौकशीचा भाग आहे. असे हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

तहसीलदार देवरे यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवल्याने हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. एवढा टोकाचा निर्णय का घेतला? काम करताना अडचणी येणारच; पण खचून जाण्यात अर्थ नाही. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर नेहमीच आरोप होतात, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण केल्या जातात. मात्र, ते खचले नाहीत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा असा सल्ला हजारे यांनी देवरे यांना दिला.

धमकी देऊन देवरे यांच्या चालकाच्या सह्या घेतल्या

नगर – तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावरील चालक आबा रावसाहेब औटी यांना रविवारी रात्री फोनवर वारंवार संपर्क करून धमकावण्याचा प्रकार घडला आहे. ‘आम्ही जसे सांगतो तशी तू तक्रार दे’ असे म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्यासाठी त्यांना त्याच्या घरातून नेण्यात आले. दमदाटी करून देवरे यांच्याविरोधातील अर्जावर सही करणे भाग पाडल्याची लेखी माहिती संबंधित चालकाने देवरे यांना दिली आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

एका विशिष्ट मनस्थितीत मी नैराश्याच्या गर्तेत गेले होते. त्या दहा मिनिटांत माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले. मात्र, ध्वनिफीत तयार करताना मन मोकळे झाले. आत्महत्येचा विचार बाजूला सारला, लढायचे ठरवले. महिला आयोगाच्या सदस्या अनिता पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी माझे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले. ध्वनिफीतीत मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. कार्यकारी पदावर काम करणाऱया महिला अधिकाऱयांच्या व्यथा मी प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या आहेत.