
सामना प्रतिनिधी । नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत 38 वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा त्यांच्या पत्राला उत्तर दिले. ’तुमचे 1 जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ एवढाच उल्लेख पत्रात करून शेतकर्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. दरम्यान, आपल्या जीवाचे बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, अशा शब्दात अण्णांनी नरेंद्र मोदींवर निशाना साधला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून सरकार दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी सरकारचा निषेध करीत जेलभरो आंदोलन केले. यावेळी पारनेर-वाडेगव्हाण महामार्गावर देखील राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.
आंदोलनादरम्यान काही ग्रामस्थांना अटक करण्यात आली. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही केंद्र व राज्य सरकारकडून अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही. केंद्र सरकार त्यांच्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करू, असे अण्णांनी स्पष्ट केले.
लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यासांठी अण्णा हजारे चार दिवसांपासून राळेगणसिध्दीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, राळेगणसिध्दी येथील ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनात सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असे अण्णा म्हणाले. दरम्यान, अण्णांच्या समर्थनार्थ नागरिकांनी आज पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तसेच पारनेरमध्ये बंद पाळण्यात आला. या आंदोलनात शकडो नागरिक सहभागी झाले होते.



























































