मोदी सरकार कृतघ्न! दिलेली आश्वासने पाळली नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

सहा महिन्यांपूर्वी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी म्हणून आंदोलन केले. त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारने सर्व मागण्या मान्य करू, असे लिखित आश्वासन दिले. मात्र  ते पाळले नाही. त्यामुळे या कृतघ्न सरकारविरोधात येत्या गांधी जयंतीपासून पुन्हा राळेगण- सिद्धीमध्ये उपोषणाला बसू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या, लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण केले होते. मागण्या मान्य करू, असे लिखित आश्वासन दिल्यानंतर 29 मार्च 2018ला अण्णांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, गेल्या सहा महिन्यांत मोदी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले गेले नाही. मोदी सरकार केंद्रात सत्तेत येऊन चार वर्षे झाली. पण त्यांनी आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप अण्णांनी केला आहे.

लोकायुक्त, लोकपाल विधेयक दुबळे केले

कृतज्ञता ही आपल्या देशाची संस्कृती आहे. मोदी सरकारने कृतज्ञतेची जाणीव ठेवायला हवी होती. त्यांनी ती ठेवली नाहीच पण कलम 44 मध्ये सुधारणा करून लोकायुक्त आणि लोकपाल विधेयक दुबळे केले. याला कृतज्ञता म्हणायची नाही तर काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

कृषीमूल्य आयोगाचे फसवे आश्वासन

केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा दिला जाईल. त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींची समिती स्थापून सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासनही सरकारने दिले होते. मात्र, तेही सरकारने पाळले नाही, असाही आरोप त्यांनी केला.

भाजप स्वतःचीच टिमकी वाजवतेय

सरकारने आतापर्यंत मला चार पत्रे पाठवली आहेत. या चार पत्रांत मोदी सरकार काय काय करत आहे, याचीच माहिती दिली आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारने चकार शब्द काढलेला नाही. त्याबाबत काहीच लिहिलेले नाही. भाजप स्वतःचीच टिमकी वाजवतेय. ठिबक सिंचन, स्पिंकलर इरिगेशनचा उपयोग करणाऱ्या आणि पाणी वाचवणाऱ्या शेतकऱ्यांचा जीएसटी सरकार माफ करत नाही आणि पंतप्रधान मोदी इस्रायलला जाऊन तिकडच्या शेतकऱ्यांची प्रशंसा करतात. भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार नाकारले नाहीत. ते नाकारण्याची इच्छाशक्ती भाजपकडे नाही, असेही हजारे म्हणाले.