कोरोनाला नाकातच रोखणारा ‘नेसल स्प्रे’ लवकरच येतोय!

कोरोना प्रतिबंधक प्रभावी लस येण्याआधी कोरोनाचा प्रसार रोखण्याचे उपाय शोधण्यात जगभरातले संशोधक मग्न आहेत. या प्रयत्नातच इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनी नाकातून शरीरात शिरकाव करणाऱया कोविड-19 विषाणूला नाकातच रोखणारा नेसल स्प्रे तयार करण्यात यश मिळवले आहे. हा स्प्रे लवकरच विक्रीसाठी बाजारात येईल अशी माहिती विद्यापीठाच्या संशोधकांनी दिली आहे.

बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाचे अभ्यासक डॉ. रिचर्ड मोआकेस यांनी नव्या कोरोना प्रतिबंधक नेसल स्प्रेची माहिती आपल्या शोध निबंधातून जगाला दिली आहे. ते म्हणतात साधारण मानवी अन्नपदार्थ आणि माणसाला सूट होतील अशी औषधे वापरून आम्ही कोरोनाच्या विषाणूंना नाकातच रोखणाऱ्या नेसल स्प्रेची निर्मिती केली आहे.

त्यामुळे या स्प्रेच्या वापराने माणसावर कोणतेही विपरीत साईड इफेक्ट होणार नाहीत याची हमी आम्ही देतो. शिवाय आम्ही हा स्प्रे तयार करण्यासाठी वापरलेले पदार्थ आणि औषधे अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन देशांच्या अन्न आणि औषध प्रशासनाने वापरास मान्यता दिलेली आहेत.

स्प्रे असे रोखणार कोरोनाच्या विषाणूंना

इंग्लंडच्या संशोधकांनी तयार केलेला कोरोना प्रतिबंधक स्प्रे अतिशय चिकट आणि चिपचिपा असल्याने नाकात मारल्यावर कोविड -19 विषाणूंना नाकातच घट्ट पकडून नष्ट करेल.

या विषाणूंना फुप्फुसात प्रवेशच मिळू न दिल्याने ते दुर्बल होऊन एकतर या रोगाचा संसर्ग वाढणार नाही. शिवाय असे विषाणू नाकात असणाऱ्या माणसाने स्प्रेचा शिडकावा आपल्या नाकात केल्यास विषाणू प्रेमधील चिकट द्रावाला घट्ट चिकटून बसतील. त्यामुळे शिंकेतून या विषाणूंचा प्रसार होण्याचा धोकाही कमी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या