मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलकांना पोलिसांनी अडवले

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला निघालेले असताना त्यांना पोलिसांनी आडिवरे येथे अडवून पूर्णगड येथे पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले. मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्गात जाईपर्यंत या आंदोलकांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री आणि आंदोलकांची भेट होऊ नये, यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर सरकारकडून दडपशाही सुरुच आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उ‌द्घाटनासाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, सचिव सतीश बाणे, काशिनाथ गोर्ले, भगवान सोगम आणि दिगंबर सोगम हे रत्नागिरीलां निघाले होते. यांना पोलिसांनी आडिवरे येथे अडवले. त्यांना ताब्यात घेऊन पूर्णगड पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गाकडे रवाना झाल्यानंतर या आंदोलकांना सोडून देण्यात आले.

पंचक्रोशीत तणाव
मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालेल्या रिफायनरी प्रकल्पातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी बारसू सोलगाव पंचक्रोशीत पसरली. प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे बारसू सोलगाव परिसरात तणाव निर्माण झाला. तहसीलदार कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. तोपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ माघारी वळले.