कोरोनातून बरे झाल्यानंतर 100 दिवसांनंतरही अँटीबॉडीज कायम राहतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्बल 100 दिवसांनंतरही शरीरात अँटीबॉडीज कायम राहतात, अशी दिलासादायक माहिती संशोधनातून समोर आली आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 96 टक्के रुग्णांच्या शरीरात या अँटीबॉडीज आढळून आल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. जपानमधील सिटी विद्यापीठाने यासंदर्भातील संशोधन नुकतेच पूर्ण केले आहे.

या संशोधनात 21 ते 78 वयोगटाचे तब्बल 250 जण सहभागी झाले होते. या सहभागी रुग्णांना गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्यांना व्यक्तींना लस देणे महत्त्वाचे असल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. तर लस न घेतल्यास त्यांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील व्हेरिएंटचा धोका असल्याची माहिती यावेळी अधोरेखित करण्यात आली आहे.

काय आहे संशोधनात

कोरोनाची लक्षणे जास्त आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटीबॉडीज कायम राहत असल्याचे आढळून आले आहे.

तर कमी लक्षणे आणि अजिबात लक्षणे नसलेल्या 97 टक्के व्यक्तींच्या शरीरात सहा महिन्यांपर्यंत अँटीबॉडीज कायम राहत असल्याचे आढळून आले आहे.